राज्यातील विविध उपसा सिंचन योजना आणि प्रकल्पांसाठी १८ हजार ६१७ कोटी रुपयांची मान्यता आणि सुधारित प्रशासकीय मान्यता मंगळवारी (ता. २०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आल्या.
यामध्ये सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी ५३२९ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता, सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी, रायगडमधील पोशीर प्रकल्पास ६ हजार ३९४ कोटी, रायगडमधील शिलार प्रकल्पासाठी ४ हजार ८६९ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.
मौजे हेत जलसिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे हेत जलसिंचन प्रकल्पास २०२५.६४ कोटी रुपयांच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे हेत जलसिंचन प्रकल्पामुळे वैभववाडी तालुक्यातील ४४७५ हेक्टर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये ८३५ हेक्टर असे एकूण ५३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हे भूसंपादन करताना भविष्यात न्यायालयीन प्रकरणे उद्भवणार नाहीत, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
‘पोशीर’ ला ६३९४ कोटी
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास ६३९४.१३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस बैठकीत मंजुरी देण्यात आली. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर १२.३४४ टीएमसीचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ८.७२१ टी.एम.सी.आहे. त्यापैकी पिण्यासाठी ७.९३३ टी.एम.सी. आणि औद्योगिक वापरासाठी १.८५९ टी.एम.सी. पाणी वापर प्रस्तावित आहे.
या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे.त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (३३.९६ टक्के, २१७१.४५ कोटी रुपये), नवी मुंबई महानगरपालिका (४२.५३ टक्के, २७८३.३७ कोटी रुपये), उल्हासनगर महानगरपालिका (९.५६ टक्के, ६११.२८ कोटी रुपये), अंबरनाथ नगर परिषद (७.०७ टक्के, ४५२.०६ कोटी रुपये), बदलापूर नगर परिषद (५.८८ टक्के, ३७५.९७ कोटी रुपये) या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळद्वारे ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/four-irrigation-projects-worth-18000-crores-approved-rat16