कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर सुरू असणाऱ्या पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. आज (ता. २७) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. विदर्भ, उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील उच्चांकी ३४.४ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाड्यात पावसाने जोर धरला असून, वाशीममधील मालेगाव १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाशीमसह यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, महागाव, उमरखेड येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २७) रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याने, तसेच उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
मॉन्सून लवकरच देश व्यापणार
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. २६) राजस्थान, हरियाना, पंजाबच्या आणखी काही भागात प्रगती केली. जैसलमेर, बिकानेर, भारतपूर, रामपूर, सोनीपत, अनुपनगरपर्यंतच्या भागात मॉन्सून दाखल झाल्याने देशाच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. मॉन्सूनच्या प्रगतीचा वेग पाहता येत्या दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र
वायव्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली ओडिशाचा किनारा ओलांडून झारखंड, छत्तीसगडकडे येण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रापासून वरील कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
https://agrowon.esakal.com/weather-news/heavy-rains-possible-in-konkan-ghatmatha-east-vidarbha-rat16