‘पंतप्रधान धनधान्य कृषी योजना’ आणि ‘कडधान्य आत्मनिर्भर मिशन’ या दोन योजना देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे भाग्य बदलण्याचे काम करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. ११) या योजनांच्या अनावरणप्रसंगी बोलून दाखविला. या दोन्ही योजनांवर सरकार ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे.
कृषी क्षेत्र विकासाच्या यात्रेचा प्रमुख हिस्सा असताना आधीच्या सरकारांनी शेतीला वाऱ्यावर सोडले होते. देशाच्या विकासासाठी कृषी व्यवस्थेमध्ये बदलाची आवश्यकता असून २०१४ नंतर याला सुरुवात झाली, असा दावा करून पंतप्रधान मोदी यांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळताना काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील कृषी धोरणांना लक्ष्य केले.
धनधान्य कृषी योजना आणि कडधान्य उत्पादन वाढीसाठीच्या ‘कडधान्य आत्मनिर्भर मिशन’ या योजनांचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, राज्यमंत्री भगीरथ चौधरी उपस्थित होते. पूर्वीच्या सरकारांकडे कृषी क्षेत्रासाठी काहीही धोरणे नव्हती. शेतीशी संबंधित वेगवेगळे विभागही आपापल्या पद्धतीने काम करत होते. एकप्रकारे भारतीय कृषी व्यवस्था दुबळी होत गेली.
https://agrowon.esakal.com/agro-special/dhandhanya-kadhanya-schemes-will-change-fortunes-modi-rat16