खरड छाटणीनंतर १-३० दिवसांचा कालावधी वेलीच्या शाखीय वाढीचा असतो. या कालावधीच्या शेवटच्या टप्यात काडीवर डोळा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. यानंतर पुढील कालावधीमध्ये घड निर्मीतीची प्रक्रिया सुरू होते. ही अवस्था साधारणपणे ३१ ते ६० दिवसांची असते. काडीमध्ये सशक्त घड निर्मितीसाठी पुढिलप्रमाणे नियोजन करावे:

पाणी व्यवस्थापन

वेलवाढीचा जोम घड निर्मितीसाठी हानिकारक ठरतो, वेलींचा जोम अधिक असल्यास जिर्बेलिन्सचे प्रमाण वाढते व सायटोकायनिन्सचे प्रमाण कमी होते याचा परिणाम फळ छाटणीला घड बाळीवर जाणे तसेच घड जिरणे ह्या समस्यांमध्ये होतो. या कालावधीत पाण्याचे प्रमाण शाखीय वाढीच्या कालावधीत दिलेल्या पाण्याच्या ५०% कमी करावे.

खत व्यवस्थापन

या कालावधीत नत्र खताचा वापर नियंत्रित प्रमाणात करणे आवश्यक असते. घड निर्मिती होण्याकरीता काडीवरील डोळ्यांमध्ये प्रथिनांबरोबरच न्युक्लिक आम्लाची (RNA) निर्मिती होणे गरजेचे असते. या प्रक्रियेत स्फुरद या मुख्य अन्नद्रव्याची भूमिका महत्वाची असते . या कालावधीत नत्राचे प्रमाण नियंत्रित करुन स्फुरद व पालाशचा वेलीला पुरवठा केल्यास सुक्ष्म घड निर्मीतीस चालना मिळते. याच कालावधीत पाढंऱ्या मुळीची वाढ होणे गरजेचे असते, कारण नैसर्गिकरित्या सायटोकायनिनची निर्मिती पाढंऱ्यामुळींच्या टोकावर होते. सर्वसाधारणपणे याचं कालावधीत वेलींमध्ये नवनिर्मिती घडत असते, यासाठी कॅल्शियम हे दुय्यम अन्नद्रव्य महत्वाची भूमिका निभावतो, तसेच वेलीच्या शेंड्याची वाढ व ॲाक्झिन निर्मीतीसाठी बोरान व झिंक महत्त्वाचे असते. या सर्व अन्नद्रव्याचा पुरवठा फवारणीद्वारे केल्यास पेशीविभाजनाची क्रिया जलद गतीने होते. तसेच आर. एन. ए व डी. एन. ए यांच्या गुणोत्तरात वाढ होते.

कॅनोपी नियोजन

द्राक्ष पिकात सुक्ष्म घड निर्मितीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सुर्यप्रकाश आहे, सुर्यप्रकाश वेलींच्या काडीवरील प्रत्येक डोळ्यावर एकसारख्या तीव्रतेने पडल्यास घडनिर्मीतीस कुठलाही अडथळा येत नाही. साधारणपणे या कालावधीत १० ते १२ तास स्वच्छ सुर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते, असे न झाल्यास संजिवकांचा वापर गरजेचा ठरतो. यामध्ये प्रामुख्याने युरासिल व ६ बी. ए . यांचा समावेश होतो.

माहिती शेअर करा