खरडछाटणी झाल्यानंतर १०-१२ दिवसांनी द्राक्षबागेत फुटी निघायला सुरवात होतांना दिसून येते. या काळामध्ये द्राक्षबागेत अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. कारण काडीची शाखीय वाढ, घडनिर्मीती व वेली मधील होणारा अन्नसाठा हे सर्व घटक एक सारख्या फुटींसाठी आवश्यक आहेत.

१) पाणी व्यवस्थापन : सुरूवातीच्या ३० ते ३५ दिवसात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी, ताण पडल्यास फुटींची वाढ असमान रित्या होते. मुळांचा विस्तार व काडीवरील पानांची संख्या यांचा ताळमेळ योग्य असल्यास पाणी नियोजन सोपे होते. मुळांचा विकास कमी व पानांची संख्या वाढल्यास वेलींची पाण्याची गरज वाढते. या कालावधीमध्ये बाष्पीभवनाचा वेग ८ ते १२ मिमी/ दिवस असतो, अशा वेळी एकरी १३६०० ते २०४०० लिटर पाणी द्यावे लागेल.

२) खत व्यवस्थापन : छाटणीनंतर लगेचच म्हणजेच २४ तासाच्या आत उच्च दर्जाच्या पालाशयुक्त खताचा वापर केल्यास एकसारख्या फुटी निघण्यास मदत होते, पालाश डोळ्यांची सुप्तअवस्था मोडण्यासाठी लागणाऱ्या इन्झाईम निर्मितीस चालना देते. ही वेलीच्या वाढीची सुरवातीची अवस्था असल्याने नत्रयुक्त खतांचा नियंत्रित वापर करणे गरजेचे असते. नत्राच्या कमतरतेमुळे काडी वांझ राहण्याची शक्यता असते, तसेच अनियंत्रित नत्राच्या वापराने पेऱ्यातील अंतर वाढल्यास व सुक्ष्मघड निर्मितीस अडथळा येतो. या ३०-३५ दिवसाच्या कालावधीत वषर्भरात लागणाऱ्या एकूण नत्राच्या ३०% पुरवठा करणे गरचे असते. यामधील काही नत्र फॅास्फरस युक्त तर काही कॅल्शियम युक्त खतांच्या स्वरूपात दिल्यास अधिक फायदेशीर ठरते.

३) फुटींची विरळणी : सुरूवातीला ८० ते ९० फुटी निघतात, त्यातील ५-१० % लवकर येतात, ७०-८० % एकावेळेस निघतात, ५ -१० % उशिराने निघतात. फुटीला ५-६ पाने आल्यानंतर एकसारख्या फुटी ठेऊन बाकीच्या काढुन टाकाव्यात. साधारणता प्रती वगर्फुटावर एक काडी याप्रमाणे नियोजन करावे, आडव्या, जमिनीसडे जाणाऱ्या फुटी काढून टाकाव्यात. विरळणीनंतर सायटोकायिननयुक्त सिवीड व सुक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास फुटींची वाढ जोमाने होते.

माहिती शेअर करा