द्राक्ष घडाचा विकास होत असतांना घडाचा दांडा किंवा सांगाडा जेवढा लवचिक तेवढी घडातील मण्यांची वाढ जास्त चांगली होते. साधारणपणे ३ ते ४ मिमी आकाराचे मणी झाल्यावर पहिली डिपिंग घेतली जाते, त्यानंतर लगेच मण्यांची विरळणी केली जाते. विरळणीनंतर घड कडक झाल्याचे दिसून येतात कारण डिंपिंग किंवा घड बुडवणीसाठी विविध प्रकारची संजिवके वापरली जातात, ज्यामुळे मंण्याच्या व घडाच्या वाढीचा वेग वाढवला जातो. कुठल्याही वाढीसाठी पेशींची निर्मिती व पेशींची वाढ गरजेची असते. पेशींची निर्मिती व पेशींच्या वाढीसाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते, पेशीभित्तिका मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सिंमेटप्रमाणे काम करते. या अवस्थेत कॅल्शियमची कमतरता झाल्यास घडाला कडकपणा येतो. वेलीला सुरवातीच्या अवस्थेपासून काढणीपर्यंत कॅल्शियम गरचे असते. कॅल्शियमच्या वहनासाठी बोरान या सुक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते. कॅल्शियम व बोरानच्या एकत्रित वापराने घडाची वाढ जोमदार होते, यांच्याबरोबरीने नैसर्गिक ॲाक्झिनचा वापर केल्यास घडाला लवचिकता प्राप्त होते. ॲाक्झिनमुळे पेशीमधील मुक्त कॅल्शियमची पातळी वाढते, पेशीद्रव्याचा सामू ०.२ युनिटने वापरानंतर ४ मिनिटात कमी होतो, प्लाझ्मा मेमरेनची कार्यक्षमता वाढते व पेशीभित्तिकेची लवचिकता वाढते.

घडालाकडकपणा येण्याची कारणे : घड वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत फॉस्फोनिक बुरशीनाशकांचा अती वापर, संजिवकांचा अतिरेक, अती थंडी, तसेच पालाशचे वाढलेले प्रमाण यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवते. यासाठी बोरानयुक्त कॅल्शियम नायट्रेटचा वापर जमिनीतून करावा व संजिवकांबरोबर दर्जेदार कॅल्शियम ॲाक्साइड, बोरान व नैसर्गिक ॲाक्झिनचा स्रोत असणारे सिविड यांचा वापर डिंपिंगमध्ये केल्यास घडाला लवचिकता प्राप्त होते.

माहिती शेअर करा