फळछाटणीपुर्वी डोळे चांगले फुगलेले असल्यास छाटणीनंतर ७ दिवसात डोळे फुटण्यास सुरूवात होते, याचं अवस्थेला पोंगा अवस्था असे देखील म्हटले जाते. पोंगा अवस्थेत ढगाळ हवामान व सतत पाऊस राहील्यास, वातावरणात आद्रता १००% असल्यास, तसेच बोदामध्ये पाणी साचलेल्या परिस्थितीमध्ये नायट्रेट नायट्रोजनचे प्रमाण वाढते, त्यामुळे जिब्रेलीनसचे प्रमाण वाढते व सायटोकायनिनचे प्रमाण कमी होते. याचाच परिणाम वेलींवर निघणाऱ्या नवीन फुटींवर होऊन निघणारा घड गोळी घडात रुपांतरीत होतो. यालाच घड जिरणे किंवा ‘फिलेज’ देखील म्हटले जाते. या परिस्थितीत बागेतील पाणी लवकर बाहेर कसे काढता येईल याकडे लक्ष द्यावे. वेलीचा जोम कमी करण्यासाठी पालाशयुक्त खताचा वापर केल्यास वेलीची वाढ नियंत्रित करता येते, याबरोबर फुलविक ॲसिड फवारणीद्वारे होणाऱ्या अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते, तर नायट्रेट रिडक्टेजसाठी मॅालिबडेनम गरजेचे असते, वेलीची पांढरी मुळी पुर्णपणे कार्यक्षम नसल्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्यरित्या होत नाही, अशावेळी फवारणीद्वारे पालाश बरोबर कमी प्रमाणात स्फुरदचा फवारणीव्दारे वापर केल्यास घड लवकर बाहेर निघण्यास मदत होते. या सर्व प्रक्रियेत वेल ताणामध्ये जाते, त्यासाठी ताणमुक्त करणाऱ्या नैसर्गिक सिविडचा वापर केल्यास वेलीचा जोम व घडाची वाढ यांचे संतुलन राखले जाते.

माहिती शेअर करा