झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य एन्झाईम्सना चालना देते, त्यामुळे त्याची मदत प्रथिने निर्मितीसाठी होते. झिंक क्लोरोफिल आणि कार्बोहायड्रेट्स निर्मितीसाठी गरजेचे आहे, झिंकच्या पुरेशा पुरवठ्याने पराग कणांच्या दर्जामध्ये व काही अंशी त्यांच्या आयुष्यमानात वाढ होते. दर्जेदार पराग कणांनी बीजधारणा चांगली होते व कणीस भरण्यास मदत होते.
पालाश हा घटक प्रकाश संश्लेषण क्रिया आणि अन्न निर्मितीत सहभाग घेतो. शर्करा निर्मितीसाठी पालाश महत्वाचा घटक असून, पर्णरंध्रांची उघडझाप सुद्धा नियंत्रित करते, ज्यामुळे पिकांतील जल संतुलन काही प्रमाणात नियंत्रित होते. पिकातील रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यास आणि काही प्रमाणात कीड प्रतिकारकशक्ती वाढविण्यास महत्वाचे कार्य करते.
पालाश व झिंक यांचा फवारणीतून संतुलित वापर केला तर तृणधाण्यामध्ये दाणे व्यवस्थित भरून त्यांचे वजनसुद्धा वाढते.