बहुतेक तणनाशके ही विम्लधर्मीय (अल्कलाइन) असतात. त्याच वेळी पाण्याचा सामूही विम्लधर्मीय असल्यास तणनाशकाची अर्धी कार्यक्षमता लवकर संपते. द्रावणाचा सामू ९ असताना त्याती अर्धी कार्यक्षमता १५ मिनिटांतच संपते. सात असताना अर्धी कार्यक्षमता २४ तासांत संपते. मात्र द्रावणाचा सामू ५ असताना हे तणनाशक कित्येक दिवसांपर्यंत क्रियाशील राहते. तणनाशक फवारणी करताना कमी ओलावा, आद्रता आणि जास्त तापमान कुटिकलची जाडी वाढवते व पर्णरंध्रे बंद होतात. त्यामुळे तणाशकाचे शोषण कमी होऊन कार्यक्षमता कमी होते, त्यासाठी जमिनीमध्ये ओलावा व हवेमध्ये आद्रता असणे आवश्यक आहे. तण लुसलुशीत असेल म्हणजेच तणामध्ये नत्राचे प्रमाण जास्त असेल तर ते लवकर मरते. त्याचबरोबर तणनाशक शिरण्याचा व वहनाचा वेग तापमान, वाऱ्याचा वेग व नोझलचा प्रकार यावर सुद्धा तणनाशकाची कार्यक्षमता अवलंबून असते.
जर तणनाशक झिंकबरोबर मिसळून फवारले तर पिकामध्ये व तणामध्ये क्लोरोफील, पानाची रुंदी, उंची, प्रकाशसंश्लेषण आणि रासायनिक व भौतिक क्रिया वाढतात. त्याचबरोबर काही एन्झाइमसना प्रेरित करते, त्यामुळे तणामध्ये तणनाशक लगेच शिरते व तण लवकर मरते. तणनाशकांमध्ये जर स्टिकर, झिंक किंवा नत्राचा वापर केला तर परिणामकारकता वाढविण्यास मदत होते. स्टिकरमुळे औषधाचे चांगले एकत्रीकरण होते, पानावर व्यवस्थित पसरते, वाहून जात नाही त्यामुळे तणनाशकाची बचत होऊन कार्यक्षमता वाढते.