पाण्याचे पिकामध्ये अन्यसाधारण महत्व आहे. पिकाच्या एकूण वजनाच्या ८०-९०% पाणी असते. पाण्यामुळे अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात तसेच साखरेचे वहनसुद्धा होते. जर एखाद्या पिकाला पाणी कमी पडले तर पिकामध्ये अजैविक ताण येतो व उत्पन्नात घट होते. ताण अवस्थेत पालाशची भूमिका खूप महत्वाची आहे कारण पालाश हे ताण अवस्थेत पर्णरंध्रांची उघडझाप व परासरण नियमन (osmoregulation) यावर नियंत्रण करते.
त्याचबरोबर प्रथिनांचे संश्लेषण, आयनचे स्थिरीकरण आणि एन्झाईमसना प्रेरित करते. पिकाला पाणी कमी पडले कि सिंगलेट ऑक्सिजन (O2⋅−) , हायड्रोजन पेरॉक्साएड (H2O2) व हायड्रॉझिल रॅडिकल (⋅OH) या हानिकारक रेअक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिजची (ROS) निर्मिती होते. या स्पेसिजमुळे वनस्पतीतील पेशीनिर्मितीवर परिणाम होतो व झाड मरते. या हानिकारक स्पेसिज नष्ट करण्यासाठी काही एन्झाईमसची आवश्यकता असते. यामध्ये प्रोलिन (Proline), कॅटालेझ, ग्लायसेन बिटैन (GB), सुपर ऑक्साइड डिसमुटेज (SOD) हे अँटीऑक्सिडंट रेअक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिजची (ROS) निर्मिती रोखतात व पिकाला ताणग्रस्त परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत म्हणून पालाश या अन्नद्रव्याबरोबर ग्लायसेन बीटेन किंवा तत्सम अमिनो ऍसिड युक्त अन्नद्रव्याची फवारणी केल्यास पावसाच्या पाण्याचा ताण पडला तरीही पीक थोडे अधिक काळ तग धरून राहू शकते.