स्फुरद,पालाश,मँगेनीज, झिंक, बोरॉन व सिलिकॉन ही अन्नद्रव्ये व सॅलिसिलीक आम्ल, जस्मोनिक आम्ल ही संप्रेरके प्रतिकारशक्ती वाढवतात व पिकांना जैविक व अजैविक ताणापासून वाचवतात. स्फुरदामुळे मुळांची वाढ चांगली होते त्यामुळे मुळकूज यासारख्या रोगाला बळी पडत नाही. पालाशमुळे पेशींचे बाहेरील आवरण जाड होते त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो. मँगेनीज हा घटक लिग्निन व फेनॉल निर्मितीसाठी महत्वाचा आहे. ऍमिनोपेप्टाडस हे एन्झाइमस् बुरशीची वाढ करते याची निर्मिती मँगेनीज रोखते. प्रथिने व स्टार्च निर्मितीसाठी झिंक महत्वाचा घटक आहे. बोरॉन हा घटक पेशीभित्तिकांची जाडी व स्थिरता वाढवते त्यामुळे पेशीं मजबूत होतात. सिलिकॉन हा घटक पेशी भिंत मजबूत करण्यासाठी शारीरिक अडथळा निर्माण करतो त्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
सॅलिसिलीक आम्ल झाडामध्ये सिग्नलिंगचे काम करते. झाडावर एखाद्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव झाला तर दुसऱ्या ठिकाणी सिग्नलमुळे प्रतिकारक्षमता वाढते. झाडांमधील सर्व क्रिया सॅलिसिलीक व जस्मोनिक आम्ल नियंत्रित करतात.
म्हणून पिकाला स्फुरद,पालाश,मँगेनीस्, झिंक, बोरॉन व सिलिकॉन या अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा केल्यास पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच काही नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून सॅलिसिलिक आम्ल व जसमोनिक आम्ल यांचे प्रमाण वाढवल्यास पिकांमधील नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीला योग्य चालना मिळते. काही जैवसंजीवके पिकामध्ये रोग प्रतिकारशक्ती जागृत करणाऱ्या जनुकांना देखील प्रेरित करून लसीकरणासारखा परिणाम निर्माण करतात.