काडीमधील घडनिर्मितीची प्रक्रिया संपत असतांनाच काडीची पक्वता सुरू होते. हा कालावधी साधारणपणे ६० ते ९० दिवसांचा असतो. या अवस्थेत गुलाबी रंगाकडून काडी दुधाळ रंगात रूपांतर होण्यास सुरूवात होते. या काळात लवकर काडी पक्वतेसाठी पुढीलप्रमाणे नियोजन करावे
वेलीचे व्यवस्थापन
या कालावधीमध्ये वाढ नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असते, शेंड्याचा जोम नियंत्रित करण्यासाठी शेंडा पिंचिग करावे. तसेच बगलफुटी वेळेवर काढाव्यात व काडीच्या तळाकडील २ ते ३ पाने काढावी यामुळे हवा खेळती राहील व सुर्यप्रकाश देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे काडी पक्वतेस मदत होईल.
खत व्यवस्थापन
घड निर्मितीच्या शेवटच्या टप्यात काडी गुलाबी रंगातून दुधाळ होते, त्यानंतर हीच काडी तपकिरी रंगांची होते. या कालावधीत नत्राचा वापर पुर्णपणे बंद करुन पालाशयुक्त खतांचा वापर करणे योग्य ठरते. या कालावधीमध्ये वार्षिक गरजेच्या २५% पालाशची पुर्तता ६० ते १०० दिवसामध्ये करणे गरजेचे असते. पालाश काडीची वाढ नियंत्रित करुन लवकर परिपक्व होण्यास मदत करते. काडी पुर्णपणे तपकिरी रंगांची झाल्यास परिपक्व झाली असे समजले जाते. काडी पक्व झाली म्हणजे त्यामध्ये लिगनीन निर्मिती चांगल्याप्रकारे झाली असा अर्थ होतो. यामुळे द्राक्षडोळ्यामधील घड मजबूत होऊन त्याचे पोषणदेखील योग्यप्रकारे होते. पुर्ण परिपक्व काडीचा काप घेतल्यास त्यामध्ये गोल आकाराचा ठिबका दिसून येतो, हा ठीपका जितका जाड तेवढी काडी परिपक्व व काडीमध्ये अन्नसाठा पुरेपुर झाला असा अर्थ होतो.