दर्जेदार द्राक्ष निर्मितीमध्ये द्राक्षघड व द्राक्षमणी यांच्या आकारमानाला अनन्यसाधारण महत्व आहे. घडाची लांबी वाढविण्यासाठी घडाच्या देठाची व पाकळ्यांची लांबी वाढणे गरजेचे असते. घडाची लांबी वाढल्यामुळे मण्यांच्या आकारमान वाढीसाठी वाव मिळतो तसेच घडाला सुबकता प्राप्त होते. आकारमान वाढीसाठी पेशींची संख्या वाढीबरोबर पेशींची लांबी वाढणेदेखील महत्त्वाचे असते. प्रिब्लुम अवस्थेत GA3 च्या वापराने पेशींची संख्या वाढते व लांबीदेखील वाढण्यास मदत होते. वेलीमधील ॲाक्झिन पातळी GA3 ची कार्यक्षमता वाढविते, वेलीमध्ये ॲाक्झिन निर्मितीसाठी झिंक गरजेचे असते तसेच, परागकणांचे आयुष्य वाढविण्यासाठी देखील महत्वाची भूमिका असते. पेशी निर्मितीसाठी कॅल्शियम गरजेचे आहे व कॅल्शियम वहन जलदगतीने होण्यासाठी बोरॉनची आवश्यकता असते. तसेच परागकणनलिका निर्मितीमध्ये बोरॉन आवश्यक असतो. नैसर्गिक ॲाक्झिनचा वापर केल्यास घडाची लवचिकता व लांबी वाढण्यास मदत होते.