अमेरिकेसमवेतच्या प्रस्तावित व्यापार करारावरून होणाऱ्या टीकेला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी (ता. ५) प्रत्युत्तर दिले. अमेरिकेसमवेतच्या व्यापार कराराच्या अनुषंगाने भारत कोणत्याही प्रकारचा दबाव मान्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले. हा करार करताना देशहितास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल, असे ते म्हणाले. ‘भारत कोणत्याही मुदतीअंतर्गत वाटाघाटी करीत नाही. देशाचे हित डोळ्यांसमोर ठेवून आम्ही वाटाघाटी करीत आहोत. आमच्या जगभरातील चर्चांमध्ये राष्ट्रीय हित सर्वोच्च आहे,’ असे पीयूष गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अमेरिकेसमवेतच्या प्रस्तावित आयात शुल्क करारावरून भारत अंतिम मुदतीच्या दबावाखाली नाही. राष्ट्रहित हे अंतिम मुदतीपेक्षाही मोठे आहे. देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल. ‘मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही मॉरिशस, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिंचेस्टाइन या चार देशांच्या ‘ईएफटीए’ गटासमवेत मुक्त व्यापार करार केले. याशिवाय गेल्या महिन्यात ब्रिटनसमवेत करार केला,’ असे गोयल यांनी सांगितले. भारत आज अतिशय मजबूत भूमिकेतून वाटाघाटी करीत आहे. या बाबतीत आम्हाला आत्मविश्वास आहे आणि जगातील कोणाशीही आम्ही स्पर्धा करू शकतो. हा यूपीएच्या काळातील कमकुवत भारत नाही, असे प्रत्युत्तर गोयल यांनी दिले.
‘मोदी पुन्हा ट्रम्पसमोर झुकतील’
अमेरिकेसमवेतच्या आयातशुल्क कराराच्या अंतिम मुदतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे सहज झुकतील, असा दावा काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (ता. ५) केला. ‘भारत अमेरिकेसमवेतचा प्रस्तावित आयात शुल्क करार पूर्णपणे अंतिम झाल्यावर आणि राष्ट्रहित केंद्रस्थानी ठेवूनच स्वीकारेल’, असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल शुक्रवारी म्हटले होते.