नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १९) आणखी चाल करत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागांसह श्रीलंकेच्या बऱ्याचशा भागापर्यंत मजल मारली आहे. बंगालच्या उपसागारातही आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला. शनिवारीपर्यंत (ता. १७) संपूर्ण अंदमान -निकोबार बेट समूह व्यापला असून, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूने प्रगती केली आहे.
अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला होता. त्यानंतर सोमवारी (ता. १९) मॉन्सूनने चाल सुरूच ठेवली असून, लवकर मॉन्सून देशाच्या मुख्य भूमी असलेल्या केरळमध्ये दाखल होणार आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत मालदीव, कोमोरीन उर्वरित भागांसह, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत
पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत उद्यापर्यंत (ता. २१) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत (ता. २२) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
https://agrowon.esakal.com/weather-news/monsoon-continues-to-advance-covers-most-of-sri-lanka-rat16