इराण आणि इस्त्रालय यांच्यात सुरू असलेला संघर्ष रविवारी (ता.२२) अमेरिकेच्या ‘एंट्री’ने अधिकच गंभीर झाला. या पार्श्वभूमीवर, इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ मध्यपूर्वेतच नव्हे, तर भारतासह अनेक देशांमध्ये चिंता निर्माण केली आहे. कारण हा मार्ग जगातील सुमारे २० टक्के तेल व्यापारासाठी महत्त्वाचा आहे. होर्मुजची सामुद्रधुनी बंद होण्याची शक्यता कायम एक धोका राहिलेला आहे, असं जाणकार सांगतात.
परंतु हा मार्ग प्रत्यक्षात कधीच बंद झाला नाही. आता मात्र हा निर्णय इराण व त्याचा मित्र देश चीनलाच सर्वाधिक त्रासदायक ठरेल, असं जाणकार सांगतात. हा मार्ग बंद झाल्याने ट्रान्सपोर्ट, एअरलाइन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. कारण या क्षेत्रांमध्ये इंधनाचा वापर अधिक असतो. त्यामुळे शेवटी वाढवलेली किंमत ग्राहकांना चुकवावी लागणार आहे. त्यामुळे वस्तु आणि सेवा करातही वाढ होऊ शकते, असं अभ्यासकांचं मत आहे.
भारत ८० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची गरज आयात करून भागवतो. त्यामुळे तेलाच्या किंमतीत होणारी वाढ ही भारतासाठी मोठी चिंता ठरते. तेल महाग झाल्यास इंधनाचा खर्च वाढतो आणि परिणामी महागाई वाढू शकते. यामुळे सरकारवर अनुदानाचा भार वाढतो आणि आयात खर्च देखील वाढतो. इराणच्या या निर्णयानंतर इंधन टंचाई आणि महागाई विषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मात्र तेलाच्या साठ्याची चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.
https://agrowon.esakal.com/agro-special/will-iran-israel-conflict-lead-to-fuel-price-hike-in-india