देशात २०२४-२५ मध्ये खतांची विक्री आधीच्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढली. युरिया, एमओपी आणि संयुक्त खतांची विक्री जास्त झाली. तर डीएपीची टंचाई निर्माण झाल्याने विक्रीही गेल्या वर्षीपेक्षा कमी राहिली. देशातील खतांचे उत्पादन वाढल्याने आयातही कमी झाली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, युरियाची विक्री २०२४-२५ (एप्रिल २०२४ ते मार्च २०५) मध्ये जवळपास ३८८ लाख टनांवर पोहोचली होती. मागील वर्षीच्या, म्हणजेच २०२३-२४ च्या तुलनेत विक्री ८.४ टक्क्यांनी जास्त होती. मागील हंगामात ३५८ लाख टन युरियाची विक्री झाली होती. एमओपी खताची विक्री तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली. मागील वर्षी १६ लाख ४४ हजार टन एमओपीची विक्री झाली होती. ती २०२४-२५ मध्ये २२ लाख टनांवर पोचली.
संयुक्त खतांच्या विक्रीतही २८ टक्के वाढ दिसून आली. गेल्या वर्षी ११७ लाख टन संयुक्त खतांची विक्री झाली होती. ती नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात १५० लाख टनांवर पोहोचली. डीएपी खतांची विक्री मात्र काहीशी कमी झाली. गेल्या वर्षीच्या ११० लाख टनांच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ९६ लाख टन डीएपी खत विक्री झाले. डीएपीची नोव्हेंबरपर्यंत टंचाई जाणवत होती. त्यामुळे मागणी असूनही डीएपी खतांची विक्री कमी दिसून आली.