खानदेशात पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवडीची तयारी सुरू आहे. कापूस बियाणे विक्रेत्यांकडे दाखल झाले असून, त्याची विक्रीही गुरुवारी (ता. १५) सुरू होणार आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २५ ते २६ लाख कापूस बियाणे पाकिटांची मागणी असणार आहे. तसेच सरळ, देशी कापूस वाणांनाही मागणी आहे. त्यासाठी शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातेत जात आहेत. अधिक मागणी असलेले काही सरळ, देशी वाण गुरुवारी उपलब्ध होतील की नाही, या बाबत शंका आहे.

कापूस लागवडीत खानदेशात यंदा घट येईल, अशी स्थिती आहे. परंतु मोठी घट येणार नाही. बागायतदार शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी करून अन्य पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. काहींनी लागवड न करण्याचे निश्‍चित केले आहे. यामुळे पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होईल. एकूण बागायती कापूस लागवड दोन लाख हेक्टरवर असते. परंतु यंदा ही लागवड दोन ते अडीच हजार हेक्टरने कमी होईल. तर एकूण कापूस लागवड खानदेशात साडेपाच लाख हेक्टरवर अपेक्षित असते. यंदा ही लागवड पाच लाख किंवा चार लाख ९० हजार हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत.

पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी शेतात पूर्वमशागत कमाल शेतकऱ्यांनी केली आहे. त्यात प्रथम खोल नांगरणी करून शेत तापू देण्यात आले. त्यानंतर अनेकांनी रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत करून घेतले. पूर्वहंगामी लागवडीसाठी १०० टक्के शेतकरी ठिबकचा खानदेशात उपयोग करतात. यामुळे लागलीच ठिबक संच व्यवस्थितपणे टाकण्याचे काम सुरू झाले. हे या महिन्यात गतीने सुरू होते. ते या आठवड्यात अनेकांनी पूर्ण केले आहे. कापूस बियाणे १५ मेपासून उपलब्ध होणार असल्याने त्याची खरेदी करून याच महिन्यात लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. खानदेशात मागील तीन-चार दिवसांत उष्णता कमी झाली आहे. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सध्या कमाल तापमान कमी झाले आहे. कारण ढगाळ वातावरण असते. पुढे तापमानात जशी घट होईल, तशी लागवड होईल. अनेक शेतकरी २५ मेनंतर लागवड करतील. तर काही शेतकरी १ जून रोजी लागवडीला सुरुवात करणार आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/sale-of-cotton-seeds-starts-from-today-preparations-for-pre-season-cultivation-in-khandesh-rat16

माहिती शेअर करा