जिल्ह्यात आठ ते दहा दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी (ता. १८) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर हवेली, शिरूर, दौंड, खेड, मावळ या तालुक्यांत हलक्या सरी पडल्या.
खरिपाच्या तोंडावर पाऊस पडल्याने हा पाऊस दिलासा देत असला तरी उन्हाळी पिकांचे व फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हवेली, शिरूर, सासवड, दौंड, जुन्नर तालुक्यांसह खेड आणि आंबेगाव तालुक्यांत ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे भाजीपाला, शेतीमाल, मेथी, कोथिंबीर, चारापिके, कांदा, टोमॅटोसह फुले, उन्हाळी बाजरी तसेच भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक भागांत आंबा पिकाचे नुकसान झाले.
काही ठिकाणी अतिवृष्टीने शेताचे बांध फुटून शेतातील मातीसुद्धा वाहून गेली. काही ठिकाणी साठवलेला कांदा सुद्धा पाण्याच्या लोंढ्यांनी वाहून गेला. उन्हाळी पिकांचा पीकविमा शेतकऱ्यांनी काढलेला नाही. त्यामुळे पीकविमा कंपन्यांकडून भरपाईची शक्यता नाही. तरी राज्य सरकारने या संदर्भात गंभीर दखल घेऊन तत्काळ पंचनामे करावेत. अगोदरच कुठल्याच शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/pre-monsoon-rains-lash-pune-crops-damaged-heavily