प्रशासनाने केलेली एखादी सुविधा नागरिकांच्या दृष्टीने किती फायदेशीर ठरू शकते हे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृतीतून दिसून आले आहे. या बाजार समितीने मागील दोन हंगामापासून हळद खरेदीचा निर्णय घेत अंमलबजावणी केली आहे. याचा फायदा तालुक्यातील व इतर भागांतील हळद उत्पादकांना होत असून गेल्या वर्षात या बाजारात सुमारे दीड लाख क्विंटलपर्यंत हळदीची उलाढाल झाली. यंदाचा हंगाम सध्या सुरू असून बाजाराच्या दिवशी येथे आठ ते दहा हजार क्विंटलची आवक होत असते, यातच वरील निर्णयाची योग्यता स्पष्ट होते.

वाशीम जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत हळदीचे उत्पादन घेतले जाते. रिसोड हा तालुका त्यातही आघाडीवर आहे. शेतकऱ्यांना पिकवलेली हळद विक्रीसाठी हिंगोली, वसमत, सांगली अशा बाजार समित्यांत जावे लागायचे. पण स्थानिक गरज पाहून येथील बाजार समितीने हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू केले. आता रिसोड बाजार समितीत हळदीची विक्री व्यवस्था सुरू झाल्याने जिल्ह्यासह बाहेरच्या शेतकऱ्यांचीही येथे गर्दी होत आहे.

शेतकऱ्यांनी नगदी पिकाच्या दृष्टीने हळदीकडे पसंती वळवली आहे. सिंचनाच्या सोयींमुळे प्रत्येक शेतकरी किमान एक ते दोन एकर हळदीची लागवड करीत असून, काहीजण आठ ते दहा एकरापर्यंतही पेरणी करतात. यंदा हळदीला सुरुवातीपासूनच १४ हजारांपर्यंत प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. गुरुवारी (ता. २४) बाजारात १३,६७५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. वाढत्या मागणीमुळे बाजार समितीने आठवड्यातून दोन दिवस (रविवारी व गुरुवारी) हळद खरेदी सुरू केली आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/risod-became-the-center-of-turmeric-rat16

माहिती शेअर करा