उन्हाचा चटका वाढला असताना राज्यातील मराठवाडा, पूर्व विदर्भ, नगर, पुणे भागांत सोमवारी (ता. ५) मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी गारपीट व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने फळपिकांचे मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी जीवितहानी झाली.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाचा कमालीचा पारा वाढला आहे. त्यातच सोमवारी (ता.५) दुपारनंतर पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव तसेच अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील वनकुटे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाने चांगलाच दणका दिला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांचे व आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले.

मराठवाड्यातील जालना तालुक्यातील रामनगर, इंदेवाडी, देवमुर्ती, सामनगाव या ठिकाणी सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शिवाय परतूर शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याशिवाय मंठा, जाफराबाद, घनसावंगी, अंबड तालुक्यांत येथेही पावसाने हजेरी लावली.

अंबड तालुक्यातील आमलगाव येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. बदनापूर शहर परिसरात दुपारी ३ ते ३.४० च्या दरम्यान वादळी पाऊस झाला. पंधरा ते वीस मिनिटे तुरळक गारपीटही झाली. कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी पावसाचे तासभर तांडव चालले. माहोरा येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. रोहिलागड किनगाव नांदी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने हजेरी लावली.

https://agrowon.esakal.com/agro-special/pre-monsoon-rains-hit-marathwada-vidarbha-rat16

माहिती शेअर करा