उन्हाच्या झळांनी होरपळत असताना पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. आज (ता. २८) विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात उन्हाचा चटका, उकाडा आणि घामाच्या धारा तापदायक ठरत आहेत. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली.