यंदा अतिउष्णता त्यातच मॉन्सूनपूर्व पाऊस अशा दुहेरी संकटात राज्यातील अंबिया बहरातील डाळिंब सापडले आहे. या निसर्गाच्या अवकृपेमुळे अंदाजे ८० टक्क्यांपर्यंत फूलगळ झाली असून तेलकट, मर रोगाचाही प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिमाणी डाळिंबाच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाजही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात यंदा ३० ते ३५ हजार हेक्टरवर अंबिया बहर शेतकऱ्यांनी साधला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपूर्वी वाढत्या उष्णतेचा फटका डाळिंब पिकाला बसला होता. या अतिउष्णतेमुळे फूल कळी निघण्यास अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे जवळपास ५० टक्के फूलगळ झाली होती. त्यातच सेटिंग होण्यास अडचणी आल्या होत्या. त्यातून शेतकऱ्यांनी बागा साधल्या. अनेक भागांत शेतकऱ्यांनी आगाप अंबिया बहर धरला होता.

एप्रिलमध्ये डाळिंबाचे वजन ७० ते १०० ग्रॅम इतक्या वजनाचे होते. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल झाले असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे झाडावर राहिलेल्या फुलांची गळ झाली आहे. सद्यःस्थितीला ८० टक्क्यांपर्यंत फूलगळ झाली असल्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे. परंतु वातावरण असेच राहिल्यास शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ होईल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

उत्पादन घटणार

अति उष्णता आणि मॉन्सूनपूर्व पाऊस अशा दुहेरी संकटामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. या साऱ्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. यामुळे अंबिया बहरातील डाळिंबाचे उत्पादन घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/pomegranate-in-bloom-in-water-rat16#goog_rewarded

माहिती शेअर करा