पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मॉन्सूनच्या आगमनाला आणखी अवकाश असला, तरी सर्वदूर पडणाऱ्या पावसाने मॉन्सूनच्या सरींचा अनुभव मिळत आहे. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाने दणका दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणी शेताला शेततळ्याचे स्वरूप आले आहे. विदर्भात मात्र उन्हाचा चटका कायम असल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४३.१ अंश तापमानाची नोंद झाली.
नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, गडचिरोली, येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. आज (ता. २२) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
https://agrowon.esakal.com/weather-news/konkan-orange-alert-on-ghats-rat16#goog_rewarded