पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहे. बुधवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत शिरूरमधील वडगाव, न्हावरा व दौंडमधील पारगाव येथे ६१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. परंतु सततच्या पावसाने पिकांच्या नुकसानीत वाढ होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. जवळपास वीस ते बावीस दिवस होऊनही राज्यात पावसाने फारशी उघडीप दिलेली नाही. मागील तीन ते चार दिवसांत पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतरही पावसाचा जोर कायम आहे. परंतु बुधवारी (ता. २८) सकाळपासून पावसाने काहीशी उघडीप दिली होती. मात्र दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन तीन वाजेच्या दरम्यान काळे कुट्ट ढग भरून आल्याने पुणे शहरात हलक्या सरी बरसल्या.

ग्रामीण भागातही अधूनमधून सरी कोसळत आहे. या पावसामुळे खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर शेतीची कामे रखडल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच पश्चिम पट्ट्यातील राजगड, भोर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत भात रोपवाटिकेच्या कामांना सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी खरिपासाठी खते, बियाणांची खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

हवामान विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार माळीण येथे ३७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर वडगावशेरी ३३, चिंचवड २९, तळेगाव ढमढेरे २७, एनडीए २४, डुडुळगाव २४, दौंड २२, मगरपट्टा १८, पाषाण १७, हडपसर, शिवाजीनगर १६ मिलिमीटर पाऊस पडला. तर तळेगाव दाभाडे, राजगुरुनगर, गिरीवण, लोणावळा, कोरेगाव पार्क, निमगिरी, नारायणगाव, दापोडी, भोर, पुरंदर येथे हलक्या सरी बरसल्या.

तर कृषी विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार दौंडमधील यवत २३, कडेगाव २४, राहू २७, वडगाव बांदे २८, बोरी पार्धी २० मिलिमीटर होते. तर वरवंड, रावणगाव, दौंड, देऊळगाव, पाटस येथे हलक्या सरी पडल्या. हवेलीतील पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरुळीकांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली, मुळशीतील पौड, घोटावडे, थेरगाव, माले, मुठे, पिरंगुट, भोरमधील भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, मावळमधील तळेगाव, काळे, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे येथे पाऊस झाला.

https://agrowon.esakal.com/agro-special/the-rain-subsided-rat16#goog_rewarded

माहिती शेअर करा