राष्ट्रीय अन्न सुरक्षा गळीत धान्य व कडधान्य योजनेअंतर्गत सन २०२३-२४ च्या खरीप व रब्बी हंगामात उत्पादित बियाण्यास महाबीजमार्फत बीजोत्पादकांना दोन कोटी २८ लाख रुपये अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा गळीत धान्ययोजने अंतर्गत सोयाबीन, जवस व मोहरी या पिकास तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य योजने अंतर्गत उडीद व हरभरा इत्यादी पिकांच्या नवीन वाण अनुदानास पात्र आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा गळीतधान्य योजनेअंतर्गत सोयाबीन पिकास ६६१ रुपये प्रती क्विंटल व मोहरी आणि जवस पिकास १०५१ रुपये प्रतिक्विंटल तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य योजनेअंतर्गत उडीद पिकास ३७०० रुपये प्रतिक्विंटल व हरभरा पिकास २५५४ प्रतिक्विंटल अशी एकूण रक्कम रुपये २ कोटी २८ लाख ७९ हजार ८३८ रुपये महाबीज कडून बीजोत्पादकांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
खरीप व रब्बी हंगामांत ज्या बीजोत्पादकांचा नवीन वाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अंतिम अहवालात पात्र ठरलेला आहे. अशा बीजोत्पादकांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. यामुळे नवीन वाणाच्या बियाणे उत्पादनास जिल्ह्यामध्ये प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाशीम जिल्ह्यातील बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, शाश्वत उत्पादनात वाढ करणे, जिल्ह्यातील बीजोत्पादक शेतकऱ्यांने नवीन वाणाचे उत्पादित केलेल्या बियाण्याचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करून आपली उत्पादकता व उत्पादन वाढवावे, असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. सावरकर यांनी सांगितले.