मे महिन्याच्या पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आज (ता. ३०) विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या प्रणालीची तीव्रता वाढल्याने या भागात वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे. गुरुवारी (ता. २९) दुपारी ही प्रणाली बांगलादेशातील सागर बेटे आणि खेपूपारा जवळ जमिनीवर आली आहे. या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरणार आहे. गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उर्वरित उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
आज (ता. ३०) विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्रातून मॉन्सूनची चाल मंदावली
बंगालच्या उपसागरातून मॉन्सूनने चाल केली आहे. मात्र अरबी समुद्रातून मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबादपर्यंत सीमा कायम होती. गुरुवारी (ता. २९) विदर्भासह, छत्तीसगड, ओडिशाच्या काही भागात, संपूर्ण पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. पूर्व भारतात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती असून, महाराष्ट्रातील पुढील प्रगतीसाठी वाट पहावी लागणार आहे.
https://agrowon.esakal.com/weather-news/heavy-rain-warning-in-vidarbha-rat16#goog_rewarded