अमेरिकेने ‘जशास तसे’ धोरणाला अनुसरून अन्य देशांसह भारतावर देखील आयातशुल्क लादण्याची घोषणा केली होती, पण नंतर मात्र त्याला नऊ जुलैपर्यंतची स्थगिती दिली होती. आता याच मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून ती एक ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या मुदत वाढीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापारी करारावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांना अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला आहे. सध्या सरकारी पातळीवर याच व्यापारी कराराच्या अनुषंगाने अमेरिकेसोबत चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आयातशुल्काच्या अनुषंगाने काही निवडक देशांना सोमवारी पत्रे पाठविली असून त्यामध्ये मात्र भारताचा समावेश करण्यात आलेला नाही.

ज्या देशांना हे पत्र पाठविण्यात आले आहे, त्यांच्या उत्पादनांवर येत्या एक ऑगस्टपासून अमेरिकेत आयातशुल्क आकारण्यात येईल. ट्रम्प यांनी ज्या देशांना हे पत्र पाठविले आहे त्यांच्यात बांगलादेश, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, थायलंड, दक्षिण आफ्रिका, बोस्निया, हेर्झेगोव्हिना, कंबोडिया, कझाकस्तान, लाओ, सर्बिया आणि ट्युनिशिया यांचा समावेश आहे.

निर्यातदारांची अशीही मते

आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अभ्यासक विश्वजित धर म्हणाले, की हा भारतासाठी मोठा दिलासा आहे. काही विशिष्ट गोष्टींवर भारताने ठाम भूमिका घेतली असल्याने हे होऊ शकले. मुंबईतील ‘टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज’चे शरदकुमार सराफ म्हणाले, की ट्रम्प यांच्याबाबतीत आपण काहीच अंदाज बांधू शकत नाही. आयातशुल्क लागू करण्यास देण्यात आलेल्या मुदतवाढीचा कालावधी खूपच कमी आहे. भारतीय निर्यातदारांनी वेगळ्या बाजारपेठेचा शोध घेणे गरजेचे आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/us-extends-import-tariffs-on-india-rat16

माहिती शेअर करा