खते उपलब्ध असूनही नसल्याचे सांगत निविष्ठा विक्रेते खतांची कृत्रिम टंचाई करतात. मात्र आता उपलब्ध खतांची माहिती लपवता येणार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घरबसल्या ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून ही माहिती मिळणार आहे. कृषी विभागाने सुरू केलेल्या उपक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते ‘क्यूआर’ कोडचे प्रकाशन करून सुरुवात केली.
खरीप, रब्बी हंगामासह सातत्याने खताची टंचाई निर्माण केली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यात तर खतटंचाईच्या सातत्याने तक्रारी असतात. खते, बियाणे व कीटकनाशकांचे मुख्य विक्रेते अहिल्यानगर शहरात बसतात आणि ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेत्यांकडून लिंकिंग करून घेतात. प्रामुख्याने मागणी असलेल्या खताची कृत्रिम टंचाई करून त्याच खतांची जादा दराने विक्री करत असल्याच्या सातत्याने तक्रारी आहे. बियाणे, खतांचे मुख्य विक्रेते याला जबाबदार असताना शेतकऱ्यांचा रोष मात्र किरकोळ विक्रेत्यांवर तयार होत असल्याचे सातत्याने अनुभवायला आलेले आहे. उपलब्ध खतांची माहिती थेट शेतकऱ्यांना कळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ब्लॉगस्पॉट तयार केले असून, त्याचा ‘क्यूआर कोड’ उपलब्ध करून दिला आहे.
https://adonagarzp.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-०-padding.html या लिंकवर जाऊन शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून माहिती घेता येईल. अगदी तालुक्यात, आपल्या गावांतील कोणत्या विक्रेत्यांकडे किती गोण्या खत उपलब्ध आहे याची माहिती मिळेल. त्यामुळे दुकानदार शेतकऱ्यांना खते देण्यास टाळाटाळ करता येणार नाही.
लिंकिंग बंद नसून सुरूच
कृषी विभागाने ‘क्यूआर कोड’मधून शेतकऱ्यांना उपलब्ध खताची माहिती मिळणार आहे. आता खताची लिंकिंग बंद असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात असले तरी श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा तालुक्यांत खतांची लिंकिंग सुरूच असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. लेखी तक्रार करण्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. तर तक्रार केल्यावर संबंधित दुकानदार जाणीवपूर्वक खत देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र खत लिंकिंग बंद नसून सुरूच असल्याचे दिसत आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/available-fertilizers-will-be-known-through-qr-code