यंदाच्या खरीप हंगामातील पीकविम्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता १४ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र शुक्रवारी (ता.एक) दुपारपर्यंत पोचलेले नव्हते, मात्र दुसरीकडे वेबसाइटवरून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबवली जात होती. तसेच, त्याठिकाणी अंतिम तारीख १४ ऑगस्ट करण्यात आलेली आहे.
या हंगामातील पीकविमा काढण्यासाठी यंदा अंतिम मुदत ३१ जुलै देण्यात आली होती. ही मुदत गुरुवारीच संपुष्टात आली. दरम्यान, पीकविमा योजनेच्या पोर्टलवर १४ ऑगस्ट ही नवीन अंतिम तारीख दाखवली जात आहे. त्यानुसार सेवा सुविधा केंद्रचालकांनी शुक्रवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांना आवाहन करणारे संदेश समाज माध्यमावर व्हायरल केले. शेतकऱ्यांनी त्वरित विमा काढावा असे त्यात आवाहन केले जात होते.
पीकविमा मुदतवाढीच्या अनुषंगाने कृषी खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तारीख वाढली असल्याचे मान्य केले. मात्र, त्याचे अधिकृत पत्र येण्याची प्रतीक्षा करीत असल्याचेही सांगितले. पीकविम्याच्या नव्या स्वरूपामुळे आणि अपुरा प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा आहे.
विमा हप्त्याची रक्कम, पीक आणि प्रक्रियेतील गुंतागुंत यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत विमा काढलेला नाही. आता वेबसाइटवर मुदतवाढ दिली गेलेली असली तरी स्पष्ट अधिकृत अधिसूचना नसल्याने यंत्रणांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
मात्र, मुदतवाढ झाल्याने वेबसाइटवर अर्ज स्वीकारण्याचे कामकाज व्यवस्थित सुरू होते. ‘‘आम्ही शेतकऱ्यांना विमा काढण्याचे सांगत आहोत. शेतकऱ्यांनी १४ ऑगस्टची संधी गमावू नये. सुविधा केंद्रांवर चौकशी करून, आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर विमा काढावा,’’ असेही या सेवा सुविधा केंद्र चालकाने सांगितले.