पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २० व्या हप्त्याच्या वितरणाला अखेर मुर्हुत मिळाला आहे. राज्यातील पात्र शेतकरी मागील दीड महिन्यापासून २० हप्त्याची प्रतिक्षा करत आहेत. परंतु विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांचा हप्ता जमा करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीएम किसानबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु आता मात्र २ ऑगस्ट रोजी पीएम किसानचा हप्ता वितरीत करण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या पीएम किसानच्या २० व्या हप्त्याचं वितरण शक्य असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे.

शेतकरी ओळखपत्र बंधनकारक?

राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी १५ एप्रिलपासून अॅग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेला शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केला आहे. परंतु पीएम किसानच्या २० व्या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक नसेल, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी ओळख क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांनाही योजनेच्या २० व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

१९ व्या हप्ताचं अपडेट

पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहारच्या भागलपूरमधून करण्यात आलं. देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २२ हजार कोटी रुपयांचा हप्ता वितरीत करण्यात आला होता. तर राज्यात एकूण ९३ लाख शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत. परंतु २० हप्त्याचा लाभ राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना घेता आला.

नवीन विक्रम

पीएम किसान योजनेतून २०१८ पासून शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन हप्त्यात ६ हजार रुपये दिले जातात. एप्रिल ते ऑगस्टचा हप्ता मागील सहा वर्षापासून जून किंवा जुलै महिन्यात वितरीत करण्यात येतो. २०२३ मध्ये सर्वाधिक उशिरा म्हणजे २७ जुलैला पीएम किसानचा हप्ता वितरीत करण्यात आला होता. आता मात्र २ ऑगस्ट रोजी हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे एप्रिल-ऑगस्टच्या हप्त्याच्या वितरणास विलंबाचा एक नवीन विक्रम झाला आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/pmkisan-20th-installment-likely-in-first-week-of-august-2000-could-be-credited-soon

माहिती शेअर करा