पंधरा दिवसांपासून राज्यातील विविध भागांत सातत्याने पडणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाने नुकसान, गेल्या काही वर्षांपासून प्रभावित असलेल्या कुकुंबर मोझॅकचा यंदाही अधिक प्रादुर्भाव आणि बाजारात सातत्याने पडत असलेले दर त्यामुळे राज्यातील विविध भागांत टोमॅटो आदर्श शेतकरी हातबल झाले आहेत. दरम्यान, संगमनेर बाजार समिती व्यापारी टोमॅटोचे दर ठरवून पडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

राज्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने संगमनेर, कोपरगाव, अकोले, पारनेर पुण्यातील जुन्नरसह नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागांत टोमॅटोचे बऱ्यापैकी उत्पादन घेतले जाते. राज्यातील अन्य भागांतही कमी जास्त प्रमाणात टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत. साधारण पावसाळी आणि उन्हाळी आशा दोन टप्प्यांमध्ये टोमॅटो उत्पादन घेतले जाते.

यंदा उन्हाळी टोमॅटोला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. साधारण पंधरा दिवसांपासून सातत्याने मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. आधी तीव्र उन्हामुळे आणि आता नेमका माल विक्रीच्या काळातच पाऊस घडत असल्यामुळे टोमॅटोचे नुकसान होत आहे. त्यातच या वर्षीही गेल्या काही वर्षांपासून अत्यंत प्रभावी असलेला ‘कुकुंबर मोझॅक’ रोगाचा साधारण पन्नास टक्के प्रभाव आहे.

टोमॅटोला बाजारामध्ये साधारण तीन रुपये किलोपासून ते १८ रुपये किलो दर मिळत आहे. त्यातून खर्चही निघत नाही. राज्यात प्रामुख्याने संगमनेर, जुन्नर व इतर बाजारांत टोमॅटोच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होते. सध्या एकतर शेतकरी नुकसानामुळे हतबल आहेत. सर्वच ठिकाणच्या बाजारात टोमॅटोला चांगला दर मिळत असताना संगमनेर येथे मात्र, माल खराब असल्याचे कारण पुढे करून दर पाडले जात आहेत.

फळे व भाजीपाला विभाग अनभिज्ञ

अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक भागात टोमॅटोवर ‘कुकुंबर मोझॅक’ व इतर रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सातत्याने येणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त असताना महात्मा फुले कृषी विद्यापीठातील फळे व भाजीपाला विभाग अनभिज्ञ आहे. यंदा टोमॅटोवर कोणत्या रोगाचा अधिक प्रभाव आहे, त्यासाठी काय उपाययोजना केल्या पहिजेत याबाबत कृषी विद्यापीठाकडून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. ‘आमच्याकडे कोणताही माहिती नाही’ असे विद्यापीठातून सांगितले जात आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/tomato-producers-in-the-state-are-desperate-rat16#goog_rewarded

माहिती शेअर करा