माॅन्सूनने काल अरबी समुद्रापर्यंत मजल मारत मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली होती. मात्र आज माॅन्सूनने याच भागात मुक्काम केला. तसेच राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस हजेरी लावत आहे. पुढील काही दिवस राज्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.मॉन्सूनने गुरुवारी दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारली होती. तसेच मालदीव आणि भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानच्या कोमोरिन भागातही माॅन्सूनची प्रगती झाली होती. सोबतच श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत माॅन्सून पोचला होता. आज मात्र माॅन्सूनने याच भागात मुक्काम केला होता.

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागासह संपूर्ण अंदमान बेटांवर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यात पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक हवामान आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदीया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ५ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यातही पावसासाठी पोषक हवामान आहे. मराठवाड्यातील काही भागात मागील ४ दिवसांमध्ये वादळी पावसाने दणका दिला आहे. तसेच पुढील ५ दिवस सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यातही काही भागात वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

https://agrowon.esakal.com/weather-news/stormy-weather-continues-in-the-state-monsoon-stays-in-sri-lanka-arabian-sea-rat16

माहिती शेअर करा