राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या मदतीने हवामानासह पेरणी, कीड नियंत्रण याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सल्ला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय कोरडवाहू पीक संशोधन संस्था अर्थात इक्रीसॅट आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) पुढाकाऱ्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हवामान सल्ला देण्यासाठी प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. नुकतीच हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर हैदराबाद येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत प्रकल्पाबद्दलची माहिती इक्रीसॅटकडून देण्यात आली आहे.

हवामानातील तीव्र बदलांमुळे शेतकऱ्यांची जोखीम वाढली आहे. या पार्श्वभूमीवर विविध संस्थांनी हवामान अनुकूल शेती पद्धतीसाठी एकत्र येत पुढाकार घेतला आहे. त्यातूनच इक्रीसॅट आणि आयसीएआरच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हाटसअॅप बॉट विकसित करण्यात येणार आहे.

या बॉटमधून शेतकऱ्यांना विविध सेवा पुरवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्रातील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अ‍ॅग्रो-मेटेओरोलॉजिकल फील्ड युनिट्सच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे इक्रीसॅटने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्पाचा अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर संपूर्ण देशात प्रकल्पाचा विस्तार करण्यात येईल, असे इक्रीसॅटचे महासंचालक हिमांशू पाठक म्हणाले..

“भारतात विकसित केलेले तंत्रज्ञान जागतिक दक्षिणेत एक महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून काम करू शकते. लहान शेतकऱ्यांना वाढत्या हवामान संकटाचा सामना करावा लागत असताना, अशा नवकल्पना त्यांना दूरदृष्टी देतात,” असे ते म्हणाले. या प्रकल्पाला ‘एआय-पावर्ड कॉन्टेक्स्ट-स्पेसिफिक अ‍ॅग्रोमेट अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेस फॉर क्लायमेट-रेझिलिएंट अ‍ॅग्रिकल्चर ॲट स्केल’ नाव देण्यात आले आहे. हा प्रकल्प मॉन्सून मिशन तीन अंतर्गत राबवण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय पशुसंवर्धन संस्था (आयएलआरआय), भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था (आयआयटीएम) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) संस्थांचा यामध्ये सहभाग आहे. 

इक्रीसॅटने यापूर्वी हवामान विषयक गुंतागुंतीची माहिती सोपी करण्यासाठी ‘इंटेलिजंट सिस्टिम्स अ‍ॅडव्हायझरी टूल’ अर्थात आयएसएटी हा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला होता. त्याचा वापर करून  मॉन्सून दोन प्रकल्पात शेतकऱ्यांना शेती आणि हवामानाची माहिती दिली जात होती. परंतु आता या डिजिटल प्लॅटफॉर्मला पूर्णत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपासून विविध टप्प्यावरील कीड नियंत्रणासह हवामान विषयक सल्ला मिळू शकेल, असे इक्रीसॅटने सांगितले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/ai-steps-into-farming-icrisat-icar-launch-smart-advisory-project-in-maharashtra

माहिती शेअर करा