खानदेशात केळी दरात मागील काही दिवसात घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांनी एकी करून दर पाडले असून, १००० ते १२०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल या दरातही केळीची खरेदी केली जात आहे. मागणी कमी व इतर फळांची बाजारात आवक वाढल्याचे कारणही खरेदीदार किंवा व्यापारी पुढे करीत आहेत.

केळीचे दर रावेर (जि.जळगाव) बाजार समिती जाहीर करते. सध्या १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचे दर दर्जेदार केळीसाठी बाजार समिती जाहीर करीत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून खरेदीदार मागील काही दिवसांपासून केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर व्यापारी सांगत होते. यानंतर शेतकरी इतर व्यापाऱ्यांशी संपर्क साधतो. पण इतर व्यापारीदेखील कमीच दर सांगतात. सफरचंद व इतर फळे येत आहेत. केळीची मागणी घटली आहे, अशी बतावणी सर्वच खरेदीदार करीत आहेत.लिंबाच्या रंगाच्या दर्जेदार केळीला मागणी आहे. तिची निर्यात होते.

मॉलमध्ये तिला उठाव आहे, अशी कारणेदेखील खरेदीदार सांगून कमी दरात सर्रास केळीची खरेदी जळगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, पाचोरा आदी भागांत केली जात आहे. केळी काढणीवर हवी तेवढी उपलब्ध नाही. सणासुदीचे, उत्सवाचे दिवस आहेत. राज्यासह इतर भागातही केळीला उठाव आहे.परंतु खरेदीदारांनी एकी करून दर पाडल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/traders-slash-banana-prices-in-khandesh-market-rat16

माहिती शेअर करा