शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डागलेल्या आयात शुल्क अस्त्रावर भारताची भूमिका स्पष्ट केली. ट्रम्प यांनी आधी जाहीर केलेल्या २५ टक्के आयात शुल्कात आणखी वाढ करून भारतावर तब्बल ५० टक्के शुल्क लावण्याची घोषणा बुधवारी (ता. ६) रात्री केली. त्यामुळे भारतातून निर्यात होणाऱ्या कापड, कोळंबी, सोयापेंडला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने भारतावर गुरुवारपासून (ता. ७) २५ टक्के आयात शुल्क लागू केले. तर नव्याने जाहीर केलेले २५ टक्के आयात शुल्क २१ दिवसांनंतर लागू केले जाणार आहे. भारताने रशियाकडून तेलाची खरेदी बंद करावी, यासाठी ट्रम्प यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. भारताबरोबर द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करताना अमेरिकेने आपल्या जीएम सोयाबीन आणि मका, गहू, इथेनॉल, डेअरी उत्पादनांसाठी भारताची बाजारपेठ खुली करण्याचा आग्रह धरला. भारत सुरुवातीपासूनच याला विरोध करत आला आहे. तसेच रशिया-युक्रेन थांबविण्याचा ट्म्प यांचा आग्रह हा मुद्दा वाटाघाटीत कळीचा ठरला.
भारत ‘सॉफ्ट टार्गेट’
ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात “आपण निवडून आलो तर चोवीस तासांत रशिया-युक्रेन युद्ध थांबवू,” अशी वल्गना केली होती.त्यानंतर त्यांनी ८ ऑगस्टपर्यंत युद्ध थांबविण्याचे जाहीर केले. त्यांनी अनेकदा रशियासोबत चर्चा केली. पण रशिया ट्रम्प यांना जुमानत नाही. त्यामुळे रशियावर दबाव आणण्यासाठी रशियासोबत व्यापार करत असलेल्या देशांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे धोरण ट्रम्प यांनी अवलंबिले आहे. त्यासाठीच ट्रम्प भारताला रशियाकडून तेल खरेदी थांबविण्यास सांगत आहेत.