भारतीय बेदाण्याला बाजारात चांगली मागणी असल्याने हंगामात समाधानकारक स्थिती होती. मात्र चीनच्या बेदाण्याची नेपाळमार्गे तस्करी होऊन भारतात विक्री होत आहे. त्याचा फटका भारतीय बेदाण्याच्या दरावर होत असून दरात काहीशी पडझड झाली आहे. हा बेदाणा प्रामुख्याने बिहारमधील पटणा व गया शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे समोर आले आहे.
यंदाचा द्राक्ष हंगाम आव्हानात्मक असल्याने बेदाणा उत्पादन उशिराने झाले. यामुळे यंदा सरासरी ६० ते ८० रुपये दर अधिक मिळत असल्याने बेदाणा उत्पादकांना काहीसा दिलासा होता. अशातच या तस्करीमुळे बेदाणा उत्पादक व व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे. भारतीय बेदाण्याच्या तुलनेत चीनचा बेदाणा कमी दरात विक्री होत असल्याने विक्रीवर दबाव वाढता असल्याने कोंडी वाढण्याची स्थिती आहे.
बिहारमधील पटणा व गया येथे विक्री होत असल्याबाबतचे चिनी बेदाण्याचे पुरावे समोर आले असून, हा बेदाणा चीनमधील बोंजोर कंपनीचा आहे. तो हत्तीबन, काठमांडू (नेपाळ) येथील ‘पूजा स्पाइसेस अँड पॅकेजिंग’ या कंपनीने आयात केल्याचे खोक्यावरील छापील मजकुरावरून समोर आले आहे. ही गंभीर बाब महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पुढे आणली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधून आयात होणाऱ्या मालावर आयात शुल्क नाही. असे असताना चीनचा माल विनाआयात शुल्क भारतीय बाजारात आणला जाऊन विकला जात आहे. गंभीर बाब म्हणजे, चीनचा बेदाणा बेकायदेशीर पद्धतीने तस्करी होऊन नेपाळमार्गे भारतात आल्याने राष्ट्रीय सुरक्षासह आयात धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे दर कमी झाल्याने बेदाणा उत्पादक व व्यापारी अडचणीत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारचे आयात शुल्क न भरता माल आल्याचा हा गंभीर प्रकार समोर आला आहे.
द्राक्ष बागायतदार संघाचा पाठपुरावा
चीनचा बेदाणा तस्करी होऊन नेपाळमार्गे आल्याने हा गंभीर प्रकार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन गंभीर प्रकरणाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. याबाबत लेखी निवेदन द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, कोशाध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिले. बेदाणा उत्पादक व केंद्र सरकारचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी संघाने केली आहे.