डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या व्यापार युध्दाचा फटका अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनने नव्या हंगामातील सोयाबीनचा एकही दाणा खरेदी केला नाही. ब्राझीलचे सोयाबीन महाग असतानाही चीनने खरेदी वाढवली आहे. यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली आहे.
अमेरिकेतील सोयाबीनची काढणी पुढील महिन्यात सुरु होईल. अमेरिकेतील शेतकरी सोयाबीन काढणीच्या आधीच फाॅरवर्ड सौदे करत असतात. असे सौदे अमेरिकेतील शेतकऱ्यांनी सुरु केले. मात्र, चीनमधीर खरेदीदार यंदा सौदे करताना दिसत नाहीत. जागतिक सोयाबीन बाजारात अमेरिका आणि ब्राझीलचा दबदबा असतो.
चीन सप्टेंबर ते जानेवारी या काळात मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी करत असतो. तर जानेवारी ते ऑगस्ट या काळात ब्राझीलकडून आयात करतो. अमेरिकेतील शेतकरी आता फाॅरवर्ड सौदे करत आहेत. परंतु चीनने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सौद्यांमध्ये एक टनही अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी केली नाही. त्यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली आहे.