चालू खरीप हंगामात खत टंचाईमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यावरून केंद्र सरकार विरुद्ध कर्नाटक, तेलंगणा असा कलगीतुराही रंगला. परंतु चीनने मात्र आता युरिया निर्यात धोरणात काहीशी शिथिलता आणल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने (एनएफएल) २० लाख टन युरियाच्या आयातीसाठी निविदा काढली असून यापूर्वी इंडियन पोटॅश लिमिटेडनेही आयातीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशात पुढील काळात खतांची उपलब्धता वाढेल, अशी अटकळ बांधली जात आहे.
देशात यंदा १ ऑगस्ट २०२५ रोजी युरियाचा साठा केवळ ३७.१९ लाख टन होता. मागील वर्षी मात्र याच काळात ८६.४३ लाख टन साठा होता. परंतु एप्रिल-जून महिन्यात युरियाची विक्री १२ टक्क्यांनी वाढली. कारण देशात विविध भागात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तर खरीप हंगामात भात व मका पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे खतांच्या मागणीत वाढ झाली. परंतु सरकारकडील खत साठा कमी असल्याने टंचाई निर्माण झाली आहे. सध्या खतांच्या काळाबाजाराने जोर धरला असून शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे.