महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी अमेरिकेतील आयोवा राज्यासोबत कृषी आणि कृषी तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात एकत्रित काम करण्याबाबत सामंजस्य करार केला. आयोवा राज्याच्या गर्व्हनर किम रेनॉल्ड्स आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत या सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “आम्ही आयोवा राज्यासोबत एक महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. यानुसार आम्ही आता कृषी आणि कृषी तंत्रज्ञानाच्या बाबतीत एकत्र मिळून काम करू. तसेच आमचे विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य राहील.”
फडणवीस पुढे म्हणाले, अमेरिकेतील स्टेट ऑफ आयोवा सोबत आज ऐतिहासिक करार केला. पहिल्यांदाच अमेरिकेतील स्टेट ऑफ आयोवा सोबत करार केला आहे. आम्ही विविध क्षेत्रात एकत्रित काम करण्याचे ठरवले आहे. आयोवा हे अमेरिकेतील कृषी क्षेत्रीतील सवार्त प्रगत राज्य हे. हे अमेरिकेचे फूड बास्केट म्हणून ओळखले जाते. उत्पादन क्षेत्रातही ते मजबूत आहेत. विशेषतः कृषी आणि कृषी तंत्रज्ञान ज्यामध्ये एआय असेल, अशा विविध गोष्टींवर एकत्रित काम करण्याचे ठरवले आहे. त्यांची एक युनिव्हर्सिटी आणि आमचे कृषी विद्यापीठ एकत्रितपणे काम करतील आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान भारतात कशाप्रकारे आणता येईल यावर काम करतील. डिजिटलायजेशन, आरोग्य, पर्यटन या सर्व क्षेत्रासोबत सहकार्य असेल. याचा फायदा महाराष्ट्राला होईल, अशा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.