राज्यातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी ८० टक्के शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या कोरडवाहू (अवर्षण प्रवण) भागातील पावसाचे प्रमाण कमी, अनियमित आणि लहरी असल्यामुळे पीक उत्पादन हे अनिश्चितत स्वरूपाचे असते. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे नियोजन करताना उत्पादन वाढीच्या दृष्टीने विविध सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. कोरडवाहू क्षेत्रात रब्बी हंगामाच्या दृष्टीने जमिनीतील ओलाव्याचे नियोजन, अर्थात मृद् व जलसंधारणाचे उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.
जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. एकूण पडणाऱ्या पावसापैकी १० ते २० टक्के पाणी जमिनीवरून वाहून जाते. १० टक्के पाणी निचऱ्याद्वारे आणि ६० ते ७० टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जाते. वाहून जाणारे, निचऱ्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी जमिनीत जास्तीत जास्त प्रमाणात कसे साठविता येईल आणि त्या ओलाव्याचा उपयोग कोरडवाहू शेतात पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे.