नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ९) करण्यात आले. राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१ कोटी रुपये निधी थेट खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री आणि सदस्य, मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या उपस्थितीत कळ दाबून हप्ता वितरित केला. सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले.
ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत. त्यानुसार ९३ लाख ९ हजार शेतकऱ्यांना ११ हजार १३० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.