सध्या कापूस आणि सोयाबीनचे भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांना हमीभावानेच विक्री करणे फायदेशीर ठरणार आहे. पण सातबारा उताऱ्यावर नोंद नसेल तर हमीभावाने ही पिके विकता येणार नाहीत.
त्यासाठी ई-पीक पाहणी करावी लागेल. प्रशासनाने ई-पीक पाहणीसंदर्भातल्या तांत्रिक अडचणी सोडवल्या असून प्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी पूर्ण करून हमीभावाने विक्रीसाठी तयारी ठेवावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.
देशातील बाजारात सध्या सर्वच शेतीमालाचे भाव दबावात आहेत. कापूस आणि सोयाबीन गेल्या वर्षीपासून हमीभावाच्या खाली आहेत. त्यातच केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढले. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कापूस आयातीवर शुल्क नसेल. त्यामुळे देशात विक्रमी आयात होऊन दर दबावातच राहणार आहेत.