केंद्र शासनाने कृषी व संलग्न क्षेत्रातील उत्पादनांच्या वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात केल्यामुळे कृषी उद्योग जगतात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या करकपातीचे सूक्ष्म सिंचन, ट्रॅक्टर, यंत्रे, खते, डेअरी, साखर, अन्न प्रक्रिया उद्योगातून स्वागत होत आहे.
ठिबक उद्योगाला सात वर्षांनंतर दिलासा
ठिबक उत्पादनांवरील जीएसटी घटण्याची मागणी २०१७ पासून सुरू होती. अखेर, कपातीचा निर्णय बुधवारी (ता. ३) घेण्यात आला. यात ठिबक व तुषार संचावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून घटवून पाच टक्क्यांपर्यंत आणला गेला आहे. इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘‘सूक्ष्म सिंचन संचावरील जीएसटी सात टक्क्यांनी कमी केला आहे. त्यामुळे संच बसविण्याच्या शेतकऱ्यांच्या खर्चातदेखील सात टक्क्यांपर्यंत बचत होईल,’’ असे असोसिएशनच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
ट्रॅक्टर उद्योगाला चालना मिळणार
ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरला लागणाऱ्या सुट्या भागांवरील जीएसटीदेखील आता पाच टक्के करश्रेणीत आला आहे. त्यामुळे राज्यातील ट्रॅक्टर उद्योगाला चालना मिळणार आहे. ट्रॅक्टर, त्याला लागणारी अवजारे व सुटे भाग पूर्वी जीएसटीच्या १२ टक्के श्रेणीत होते. नव्या कर रचनेमुळे ट्रॅक्टरसह हार्वेस्टर (कापणी यंत्रे), बेलर (तूस कापून गाठी बांधणारे यंत्र) आणि ट्रॅक्टरचलित यंत्रे व त्याचे टायर याच्या किमती शेतकऱ्यांसाठी किफायतशीर होतील, असे ट्रॅक्टर उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/gst-cuts-boost-agriculture-and-allied-industries-rat16