हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे फळपीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे फळपिके संरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या द्राक्ष, आंबा, पपई आणि मोसंबीसाठी ऑक्टोबरअखेर अर्जाची मुदत आहे. शेतकऱ्यांनी त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे फळपिकांचे उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांवर नोंदवलेल्या माहितीच्या आधारे पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता इत्यादी घटकांचा अभ्यास करून विमा रक्कम निश्चित केली जाते.
यामध्ये मृग बहारातील डाळिंब, पेरू, लिंबू, चिक्कू, सीताफळ, मोसंबी, आंबिया बहारातील डाळिंब, द्राक्ष, आंबा, पपई, केळी, मोसंबी आदी फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी ऑक्टोबरअखेर मुदत असल्याने शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, परिसरातील आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), बँक, प्राथमिक कृषी पतसंस्था किंवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.