भारताच्या हरितक्रांतीचे जनक, शेतकऱ्यांचे खरे मार्गदर्शक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस ७ ऑगस्टला असतो. यावर्षी त्यांच्या १००व्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाने हा दिवस ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. स्वामिनाथन यांच्या विज्ञानाधारित शेती, हवामान अनुकूल शेती, अन्न सुरक्षा आणि महिला शेतकरी सशक्तीकरणातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाणार आहे. यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.
‘शाश्वत कृषी दिन’ साजरा करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून लवकरच अधिकृत सूचना जाहीर करण्यात येणार आहेत. या निमित्ताने राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, जनजागृती उपक्रम तसेच शेतकरी संवादाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच, कृषी विद्यापीठांमध्ये शाश्वत शेती या विषयावर विशेष सादरीकरणे व संशोधन सत्रे घेण्यात येणार असल्याचेही कोकांटेनी सांगितले.
‘डॉ. एम.एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर’ ची स्थापना
तसेच, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये ‘डॉ. एम.एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर संशोधन केंद्र’ स्थापन केली जाणार आहेत. हे केंद्र नवकल्पना विकसित करून त्या तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे.
डॉ. स्वामिनाथन यांच्या नावे पुरस्कार योजना
यावर्षीपासून डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या नावे राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करण्यात येणार आहेत. शाश्वत शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्काराद्वारे सन्मानित केले जाईल.