अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जीपीएस टॅगिंग केलेला फोटो अपलोड करण्याची शेतकऱ्यांना सक्ती करणार नाही, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. या बाबत धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याचेही मंत्री पाटील यांचे स्वीय सहायक राजेंद्र केजरे यांनी सांगितले.

मराठवाड्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अर्जात नुकसान क्षेत्राचा जीपीएस एनेबल्ड टॅगिंग असलेला फोटो जोडण्यात यावा, असे वाक्य नमूद केले आहे. परंतु असे फोटो शेतकऱ्यांनी काढणे अपेक्षित नाहीत, असेही केचरे यांनी सांगितले. पंचनामा करणाऱ्या यंत्रणेने जागेवर जाऊन पाहणी करून तपशील नोंद करणे अपेक्षित आहे. तसेच स्थळ पाहणीवेळी कर्मचाऱ्यांनी पंचांसमक्ष पंचनामे करून फोटो काढणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

महसूल यंत्रणेची नस्ती उठाठेव

कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पंचनाम्यात जीपीएस एनेबल्ड फोटोच्या सक्तीचा प्रश्न हा विविध प्रशासकीय यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे निर्माण झाला आहे. वास्तविक अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व नुकसान झालेले असून अशा व्यापक नुकसानीच्या स्थितीत वैयक्तिक छायाचित्रांची काहीच आवश्यकता नाही. सरकारकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसानग्रस्त भागाची उपग्रह छायाचित्रे उपलब्ध होतात.

https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-are-not-required-to-take-photos-rat16

माहिती शेअर करा