‘‘शाश्वत बांबू लागवड करण्यासाठी ‘नरेगा’च्या धर्तीवर औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांच्या जिल्ह्यांत महानिर्मितीमधून मदत करण्यासाठी बृहत् आराखडा तयार करू. आगामी बांबू धोरणातून बांबू उत्पादकांसाठी एकात्मिक बाजारपेठ निर्मितीसाठी सरकार प्रयत्न करेल,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १८) दिले.
जागतिक बांबू दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बांबू परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या सत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘बांबू क्षेत्रात जागृती आणि धोरणाची गरज आहे. पाशा पटेल यांच्यासारखे कार्यकर्ते जागृती करतील आणि धोरण सरकार सांभाळेल. यातून शेतकरी जीवनात क्रांती आणू शकतो. शेतकऱ्यांना वातावरण बदलाच्या परिणामाला सतत सामोरे जावे लागते.
ते पुढे म्हणाले, की औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये ‘कॅप्टिव्ह’ ऑइलचा वापर होतो तो बांबूपासून निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ज्या जिल्ह्यांत औष्णिक वीज प्रकल्प आहेत तेथे नरेगाच्या धर्तीवर बांबू लागवडीसाठी महानिर्मितीमार्फत मदत करता येईल. यासंदर्भात ऊर्जा विभाग त्याचे धोरण तयार करेल. या परिषदेतून समोर आलेल्या मुद्द्यांचा मसुदा सरकारला सादर करावा. आगामी बांबू धोरणामध्ये त्याचा समावेश करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
https://agrowon.esakal.com/agro-special/strategy-to-help-bamboo-through-maha-nirmithi-rat16