शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरे आयोजित केले जातात. मात्र या दौऱ्याचा खर्च ४.२० लाख रुपयांवर गेला असूनही अनुदानाची मर्यादा १ लाखच आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक भार लक्षात घेऊन अनुदानाची मर्यादा वाढवून परदेश अभ्यास दौरे तातडीने पुन्हा सुरू करावे, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. तर कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेत याकडे लक्ष वेधल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
परदेश दौऱ्यांच्यासंदर्भात आमदार तांबे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी कैफियत मांडली होती. त्यावर गत पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्याच्या आयोजनाबाबतचा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता. त्यानंतर कृषी आयुक्तालयामार्फत २०२५-२६ साठी योजना पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याचा निर्णय झाला. मात्र दौऱ्यासंबंधी अनुदानात गेल्या १२ ते १५ वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. शासनाकडून परदेश दौऱ्यासाठी अनुदान म्हणून एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा १ लाख रुपये यापैकी जे कमी आहेत ते दिले जात होते. २०२५-२६ मध्ये परदेश दौऱ्याचा खर्च सुमारे ४ लाख २० हजार रुपये इतका झाला. मात्र असे असताना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतील काहीही वाढ झालेली नाही.