हवामानाच्या संभाव्य धोक्याची माहिती गावातच मिळण्यासाठी जिल्ह्यातील १०३२ पैकी ९९६ ग्रामपंचायतींकडून स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू केले जात आहे. आतापर्यंत ७५ ग्रामपंचायतींनी हे केंद्र सुरू केले आहे. उर्वरित ४९८ ग्रामपंचायतींनी जागा निवडली आहे. तर, ४२३ ग्रामपंचायती हवामान केंद्रांसाठी जागा शोधत आहेत. ५ ऑक्टोबरपर्यंत जागा निवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात केंद्र सरकारच्या हवामान ‘विंड’ (वेदर इर्न्फमेशन नेटवर्क डाटा सिस्टिम) प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र सुरू केले जात आहे. हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टी, पुराचे संकट आणि पिकांचे होणारे नुकसान यामुळे ग्रामीण भागात वेळेवर माहिती मिळणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील १०३२ पैकी ९९६ ग्रामपंचायतींकडून स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हवामान केंद्रांमधून मिळणारी दररोजची माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पावसाचे प्रमाण, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यांची अचूक नोंद मिळाल्याने पेरणी, खतांचा वापर, कीटकनाशक फवारणी आणि पिकांना पाणी देणे यासंबंधी शास्त्रशुद्ध निर्णय घेता येतील. कीड, रोग नियंत्रण आणि बाजारपेठेत नियोजनबद्ध आवक करण्यास मदत होईल. अचानक येणाऱ्या पावसाचा अंदाज मिळाल्याने पिकांचे नुकसानही टाळता येणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/automatic-weather-stations-launched-across-kolhapur-villages-mj18

माहिती शेअर करा